भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. सातारा रस्त्यावरील दरी पुलाजवळ ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. निलेश सीताराम भुड (वय 25, रा. गोवारे, ता. पाटण) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर पांडुरंग मोटल (वय 24) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यपीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या गोवारे गावचे आहेत. दरम्यान दोघे शुक्रवारी दुपारी पाटणवरून पुण्याला येत होते. जखमी पांडुरंग हा दुचाकी चालवत होता. तर भुड हा पाठीमागे बसला होता. ते कात्रज बोगद्यातून बाहेर आल्यानंतर दरी पुलाच्या पुढे आल्यानंतर पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. त्यात दोघेही खाली कोसळले.

मात्र यात गंभीर मार लागल्याने भुड याचा मृत्यू झाला. तर पांडुरंग याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघात झाल्यानंतर ट्रक चालक तेथून माहिती न देता पसार झाला. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.