चोरीच्या ‘स्पोर्टबाईक’वर गर्लफ्रेन्डला फिरवलं, ‘सावज’ पोलिसांना गवसलं

पुणे, पोलीसनामा  ऑनलाइन – गर्लफ्रेंडला फिरण्यासाठी शहरातील विविध भागातील स्पोर्टबाईक चोरून त्यावर तिच्यासोबत सफर मारणार्‍या दोघांना फरासखाना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. गर्लफ्रेंडसोबतची सफर अन मौजमजा करण्यासाठी ते दुचाकी चोरत होते. त्यांच्याकडून वाहन चोरीचे तब्बल 20 गुन्हे उघडकीस आले आहेत.

संतोष विष्णू नागरे (वय.. रा. गुरुदत्त कॉलनी भेकराईनगर हडपसर आणि सागर शरद समगीर (रा. वीर ता. पुरंदर जिल्हा, मुळ. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरात स्ट्रीट क्राईमसोबतच घरफोड्या अन वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातून पार्किंग केलेल्या दुचाकी चोरीला जात आहेत. दरदिवसाला तीन ते चार वाहने चोरीला जात आहेत. अनेक उपाययोजना करूनही पोलिसांना वाहने चोरीचे सत्र थांबविता आलेले नाही.

दरम्यान, स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेला सराईत तसेच वाहन चोरट्यांवर नजर ठेवून जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, फरासखाना पोलीस ठाण्यातील हद्दीत वाहन चोरी व घरफोडी प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी कर्मचारी शंकर कुंभार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन व्यक्ती पल्सर दुचाकीवर रविवार पेठेत थांबले आहेत. त्यानुसार, त्या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर उडवाउडवीचे उत्तरे दिली. सखोल तपास केल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरीची कबूली दिली. दोन दिवसांच्या तपासात त्यांच्याकडून वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरल्याचे सांगितले.

सागर हा मोबाईल दुरूस्तीचे कामे करतो. कॉमन मित्राच्या माध्यामातून संतोष आणि सागरची ओळख झाली होती. गेल्या एक वर्षांपासून ते दुचाकी चोरत असल्याचे समोर आले आहे. दुचाकी चोरून त्यांनी दोन ते तीन दुचाकींची विक्री देखील केली आहे. सागरने दुचाकी त्याच्या शेतात ठेवल्या होत्या.
तर, आरोपी चोरीच्या दुचाकीवरून गर्लफ्रेंडसोबत मौजमजा करत होते. त्यांच्यासोबत या दुचाकींवरून त्यांनी सफर देखील केल्याची माहिती देण्यात आली आहे.

त्यांच्याकडून फरासखाना, हडपसर 2, विमानतळ 7, विश्रांतवाडी 2, कोंढवा, सासवड, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 20 दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ एकच्या स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, यशपाल सुर्यवंशी, पथकातील शंकर कुंभार, अमोल सरडे, विकास बोर्‍हाडे, मयूर भोकरे, महावीर वलटे, अमेय रसाळ, शेख, दळवी यांच्या पथकाने केली आहे.