जीवाची पर्वा न करता पुणे पोलिसांनी वाचवले 7 जणांचे प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रुद्रावतार धारण केलेल्या पावसाने बुधवारी शहर आणि परिसरात हाहा:कार उडवून दिला. रात्री सुरु झालेल्या पावसामुळे रस्त्यांना ओढ्या- नाल्याचे स्वरूप आले होते. मुसळधार पावसामुळे ओढे ओव्हरफ्लो झाले होते. अचानक आलेल्या पाण्यामुळे ओढ्या किनारी राहणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. पाण्याचा प्रचंड वेग आणि घरात घुसलेल्या पाण्यामुळे घरात काही लोक अडकले होते. या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धाऊ आली ती खाकी वर्दीमधील देवमाणसं.

स्वारगेट पोलिसांनी स्वत: च्या जीवाची परवा न करता पुराच्या पाण्यात अडकलेल्या सात जणांना रेस्क्यू करून बाहेर काढले. यामध्ये जेष्ठ नागरिक, महिला आणि एका युवकाचा समावेश आहे. सहकारनगर येथील गुरुराज सोसायटीमध्ये अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढले. वाढते पाणी आणि पाण्याचा प्रचंड वेगामुळे नागरिकांना बाहेर काढणे कठीण होते. घरामध्ये पाच फुटापर्यंत असलेल्या पाण्यातून पुणे पोलिसांनी नागरिकांना बाहेर काढले.


तर दुसऱ्या एका ठिकाणी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होते. या ठिकाणी अडकलेल्या महिलांना पुरातून वाहत आलेल्या गाड्यांवर चढून महिलांचे प्राण वाचवले. तर दुसऱ्या ठिकाणी रस्सीच्या सहाय्याने एका युवकाला रेस्क्यू करण्यात आले. रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुणे पोलिसांनी रात्री एक ते पहाटे पाच पर्य़ंत रेस्क्यू करून सात जणांचे प्राण वाचवले. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त, स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पोलीस उपनिरीक्षक कदम, केंजाळे कुंभार मंकराज, धनवे, शिंदे यांच्या पथकाने अहोरात्र झटून सात जणांना रेस्क्यू केले.



ड्युटी संपली तरी कर्तव्यावर हजर

पुणे शहर आणि परिसरात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे मोठे हाल झाले. त्यावेळी पुण्यातील वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यांनळे घरी जाणाऱ्या वाहन चालकांना मार्ग दाखण्याचे काम वाहतुक पोलिसांनी केले. भूमकर चौकात व इतर चौकात पुणे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त निलीमा जाधव आणि त्यांच्या सहकार्ऱ्यांनी पाण्यात उभे राहून वाहतूक सुरळीत केली. तर येरवडा येथील सादलबाद चौकात ड्युटीवर असलेल्या अशोक थोपटे यांनी आपली ड्युटी संपली असताना देखील कर्तव्य बजावले. नागरिकांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहचवण्यात या खाकी वर्दीतल्या माणसांनी कर्तव्यदक्षता दाखवली.

 

Visit : policenama.com