राज ठाकरेंच्या सभा २३ तारखेपर्यंत अश्याच सुरु राहाव्यात, त्यामुळे जनतेची करमणूक होईल : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी निवडणुकांनंतरही अशीच चालू राहावी. त्यामुळे २३ तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक होईल. असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे. याचबरोबर राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत जे कुटुंब आणले होते. त्यांच्या त्या फोटोंचा भाजपशी काहीही संबंध नाही. असेही त्यांनी म्हंटले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील काळाचौकी परिसरातील शहीद भगतसिंग मैदानात सभा झाली. त्यावेळी भाजपने मोदी है तो मुमकीन है’ म्हणणाऱ्या एका योजनेच्या जाहिरातीसाठी वापरलेल्या फोटोतील कुटुंबाला सभेवेळी थेट मंचावर आणले. आणि भाजपच्या आयटी सेलच्या लावारीस कारट्यांनी खोट्या प्रचारासाठी या कुटुंबाच्या घरगुती फोटोचा वापर केला आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. इतकेच नव्हे तर, उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचे आवाहन करणे म्हणजेच मोदींची सत्ता जात आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असाच संदेश आहे. आजपर्यंत एखाद्या उद्योगपतीने जाहीरपणे कोण्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्याचे मला तरी आठवत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हंटले.

राज ठाकरे यांच्या त्या वक्तव्याला विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे म्हणणे म्हणजे पवारसाहेबांचे बोट धरुन पुढे येणे आहे. या देशाचा पंतप्रधान कोण होणार हे मुकेश अंबानी ठरवत नसून, देशातील सर्वसामान्य जनता ठरवत आहे. असे विनोद तावडे यांनी म्हंटले. याचबरोबर, राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत जे कुटुंब आणले होते. त्यांच्या त्या फोटोंचा भाजपशी काहीही संबंध नाही. कुणीतरी तो फोटो काढून मोदी हे तो मुमकीन है. असे लिहित त्या कुटुंबाचा फोटो जोडला. अर्थात, त्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय तो फोटो प्रसिद्ध करणे चुकीचे आहे. विशेष म्हणजे, फोटोवर हे लाभार्थी असे कुठेही लिहिले नाही. असेही विनोद तावडे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी निवडणुकांनंतरही अशीच चालू राहावी. त्यामुळे २३ तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक होईल. असा टोलाही त्यांनी लगावला.