‘भाजपानं राज्यभरात पुकारलेलं दूध आंदोलन म्हणजे पुतण्या मावशीचं प्रेम’, राजू शेट्टींचा घणाघात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाने राज्यभरात पुकारलेले आंदोलन म्हणजे पुतणा मावशीचे प्रेम आहे, अशी खोचक टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, भाजप काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. जर राज्य सरकारविरुद्ध हे आंदोलन असेल तर ही दूध उत्पादकांची फसवणूक आहे, अशी टीका राज्य शेट्टी यांनी केली आहे.

“दूध दरवाढीवरून भाजपाने आज पुकारलेले आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. यासाठी ठोस उपाय करण्याचे काम केंद्रातील सरकारचे आहे. केंद्राने दुग्धजन्य पदार्थाची आयात थांबवून, निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जीएसटी मागे घेतला पाहिजे. असे म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. त्याचप्रमाणे राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर ५ रुपये जमा करावे, हाच सध्याच्या काळात मोठा दिलासा ठरेल. याबाबत लवकर राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाही, नाहीतर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, यावेळी राजू शेट्टी यांनी दिला.

राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू – सदाभाऊ खोत

राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘राजू शेट्टी आता हे काजू शेट्टी झाले आहेत आणि या भंपक माणसाला आता कोणी किंमत देत नाही, तसेच त्यांची अवस्था गावाला देवाला सोडलेल्या वळू सारखी झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्या प्रमाणे सोडले आहे. म्हणून आता काय करावं आणि काय नाही, हे सुचत नाही. याउलट राजू शेट्टी यांनी दूध दराच्या आंदोलनाचं नाटक केलं. बारामतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पायी गेलो आणि त्याच ठिकाणी राजू शेट्टी मात्र आपल्या आमदारकीसाठी पाय चाटायला गेले. पण अद्यापही राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिलेली नाही. कारण राजू शेट्टी जाईल तिथं खंजीर खुपसतात हे त्यांना माहिती आहे, अशी जहरी टीका खोत यांनी केली आहे.