‘या’ प्रकारे आणलं गेलं पुलवामा हल्ल्यासाठी RDX, NIA च्या आरोपपत्रातून खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मागील वर्षी 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाल्याने संपूर्ण जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. दरम्यान, या हल्ल्यासाठी आरडीएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याचे तपासात उघड झालं.त्यामुळे हे आरडीएक्स नेमकं आणलं कोठून असा सवाल सातत्याने विचारण्यात येत होता.

आता पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएन या हल्ल्याबाबतचं पाच हजार पानांच आरोपपत्र तयार केलं आहे. हे आरोपपत्र आज न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. तेच या आरोप पत्रामधून अनेक खळबळजनक दावे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

RDX पाकिस्तानमधून आणले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपपत्रामध्ये पाकिस्तान मधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर आणि रौफ अझगर याची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत. तसेच पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यातील बसवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे पाकिस्तान मधून आणण्यात आले होते.

असे आणले स्फोटके

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरडीएक्ससह अन्य स्फोटक दहशतवादी पाठीवर लादून घेऊन आले होते. तसेच या प्रकरणातील एक अन्य आरोपी असलेला इक्बाल रादर हा उमर फारुख या दहशतवाद्याला रात्रीच्या अंधारामध्ये नियंत्रण रेषा पार करवून काश्मीर खोऱ्यात घेऊन आला होता.

आमावस्येच्या रात्री घुसखोरी

नियंत्रण रेषा पार करुन देतानाचा व्हिडीओ एनआयएला मिळाला आहे. त्यामध्ये अमावस्येच्या रात्री घुसखोरी करण्याच्या कारस्थानाचा उल्लेख आहे. हा व्हिडीओ एनआयएला उमर फारुखच्या मोबाईलमध्ये मिळाला होता. या फोनमधील माहितीवरून तपास यंत्रणेला दहशतवाद्यांच्या कारस्थानाची माहिती मिळाली आहे.

काही स्फोटके ऑनलाइन खरेदी

सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले अमोनियम नायट्रेड आणि नायट्रो ग्लिसरिन यासारखे पदार्थ स्थानिक पातळीवर गोळा केले होते. दरम्यान, काही स्फोटक ही दहशतवाद्यांनी काश्मीरमधून ऑनलाइन खरेदी केली होती, असेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.