डोपिंग प्रकरण : रशियाला ‘वाडा’चा ‘दणका’, 2020 ऑलिम्पिक स्पर्धंत बंदी

वॉशिंग्टन : वृत्त संस्था –  वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडा या संघटनेने डोपिंगच्या आरोपाखाली रशियावर ४ वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे आता पुढील चार वर्षे रशियातील कोणताही खेळाडू कोणत्याही  ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही़. रशियाच्या अनेक खेळाडूंबाबत डोपिंगची प्रकरणे उघडकीस आली होती. त्यांच्यावर रशियाने काहीही कारवाई केली नाही़ तसेच खेळाडुंचे डोपिंगचे अहवाल बदलले.

त्यामुळे सोमवारी झालेल्या बैठकीत रशियावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता २०२० मध्ये होणा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाचा ध्वज, राष्ट्रगीत आणि संघाचे नाव पहायला मिळणार नाही. याशिवाय २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेलाही रशियाला मुकावे लागणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या हिवाळी  ऑलंपिकमध्ये अनेक रशियन खेळाडूंवर डोपिंगचा आरोप झाला होता.

मॉस्को येथील वाडा च्या कार्यालयात रशियन खेळाडूंचा चुकीचा डोपिंग अहवाल वाडा कडे पाठविला गेला होता. तो आरोप रशियाच्या शासकीय क्रीडा समित्यांनी मान्य केला. तेव्हापासून हा वाद क्रीडा जगतात चर्चेचा होता. या अहवालानंतर २०१४ च्या रशियाच्या ऑलिंपिक स्पर्धेतील कामगिरीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

वाडा या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून खेळाडु उत्तेजक औषधे घेत नाही ना याची तपासणी करण्यात येते. स्पर्धेच्या सुरुवातीला, स्पर्धेती खेळाडूचा सहभाग झाल्यानंतर तातडीने किंवा सरावादरम्यान वाडा खेळाडूंची डोपिंग चाचणी घेते. त्यात जर त्याने बंदी असलेली उत्तेजक औषधे घेतली असल्याचे दिसून आले तर त्यांची पुन्हा चाचणी घेतली जाते. दोन्ही चाचणीत तो दोषी आढळला तर त्याच्यावर काही काळासाठी बंदी घातली जाते.