मृत्युनंतर ‘यमदूत’ जी अवस्था करतात ती सांगून ‘समर्थ’ आपल्याला ‘सावध’ करीत आहेत, जाणून घ्या

रवीसूत ते दूत विक्राळ येती l
तुझ्या लिंगदेहासि ओढूनि नेती |
तुला खंडिती मुंडिति दंडिती रे l
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे||

या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला मृत्युनंतर यमदूत जी अवस्था करतात ती सांगून सावध करीत आहेत. मृत्युनंतर जी काही गती प्राप्त होते ती देहात असताना केलेल्या कर्मांवरच अवलंबून असते असं संत सांगतात.

शास्रांमध्ये चार देहांचे वर्णन केले आहे. स्थूलदेह, सुक्ष्मदेह, कारणदेह, आणि लिंगदेह. यांपैकी केवळ स्थूलदेह जो अस्थी, रक्त, मांस, ईत्यादींपासून बनलेला आहे, तोच आपण बघू शकतो. बाकीचे तीन देह हे केवळ संत अथवा ज्यांना योगशास्राचे संपूर्ण ज्ञान आहे तेच जाणू शकतात. म्हणून ही संतमंडळी वारंवार आपल्याला सावध करत असतात.

या श्लोकामध्ये समर्थ सांगतात की, अंतःकाळी हे यमदूत येऊन लिंगदेहाला घेऊन जातात आणि कर्म, पाप, पुण्य जसे असेल त्यानुसार दंड देतात. मग पापपुण्याचा हिशोब होऊन परत फेरे सुरू.

या सर्व यातनांपासून, यमजाचणी पासून सुटका कशी होईल? काय केले असता या यमदूतांच्या दंडापासून दूर राहता येईल? तर समर्थ म्हणतात, “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे”.

अंतःकाळच्या यातनांपासून जर कोणी सोडवू शकत असेल तर ते म्हणजे नाम. जो नाम घेतो त्याला कळीकाळाचे भय नाही असे संत सांगतात. संत नामदेव महाराज आपल्या हरीपाठात म्हणतात की जो नाम घेतो त्याला काळ देखिल वंदन करतो.
“म्हणतां वाचे नाम, वंदी तया यम| काळादिक सम वंदी तया||”.

म्हणून या यमदूतांच्या बाधेपासून सुटण्यासाठी, हा भवसागर तरून जाण्यासाठी नाम हेच सोपे साधन आहे असे सर्वच संत आपल्याला वारंवार सांगत असतात.

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/