साताऱ्यातील लोकसभेची पोट निवडणूक जाहीर, उदयनराजे पुन्हा विजयाची कॉलर उडवणार का ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र विधानसभेसोबतच लोकसभेचीही पोट निवडणूक लावण्याचा आग्रह उदयनराजेंनी केला होता. विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा तर झाली मात्र उदयनराजेंच्या पोटनिवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने काहीच सांगितले नव्हते.

उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून, विधानसभेसोबत म्हणजेच २१ ऑक्टोबरलाच साताऱ्यात मतदान होणार आहे.

सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे पोटनिवडणुकीचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सातारा पोटनिवडणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व महाराष्ट्रात सध्या भाजपचे जोरदार वारे वाहत आहे त्यामुळे उदयनराजेंसाठी हा सुखद धक्का मानला जातोय. राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराची घोषणा अजून झालेली नाही मात्र यावेळी उदयनराजे पुन्हा एकदा लोकसभेच्या विजयाची कॉलर उडवणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.