राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याचं पुण्यात ‘कोरोना’मुळं निधन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ मारुती पवार (वय-67) यांचे आज (दि.8) सकाळी कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यावर दशरथ पवार यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. दशरथ पवार यांना मधुमेह, रक्तदाब आदी आजार होते.

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर पवार हे जुन्नर तालुक्यातील पंचायत समितीचे 1992 -1997 या सलग पाच वर्षात सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पंचायत समितीचा पुरस्कार मिळाला होता. चौथीच्या मुलांसाठी चावडी वाचन हा उपक्रम त्यांनी तालुक्यात राबवला होता. हा कार्यक्रम नंतर जिल्ह्यात राबवण्यात आला.

दशरथ पवार यांचे मुळ गाव पारुंडे हे होते. येथे भरणाऱ्या नाथपंथीय साधूंच्या समितीचे ते अध्यक्ष होते. गावात एकोपा रहावा, यासाठी गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असे. गावच्या तंटामुक्त समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी पारुंडे गावच्या विद्यमान सरपंच आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय होते. अजित पवार जुन्नरला आल्यानंतर आमची भावकी कोठे आहे, असे म्हणत ते त्यांची आवर्जून चौकशी करत होते.