नायलॉन मांजामुळे पुरुषाच्या नाकाला गंभीर इजा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –   दुचाकीने जात असताना नायलॉन मांजा अडकल्याने पुरुषाच्या नाकाला गंभीर इजा झाल्याची घटना निमगाव वाकडा रोड वर असलेल्या राजवाडा परिसरात घडली.नायलॉन मांजाने नाकाच्या स्नायू व रक्तवाहिनी तुटल्याने या पुरुषावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली.

लासलगाव येथील पिंजार गल्ली येथे वास्तव्यास असलेल्या रफिक नवाजखान पठाण हे रविवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्यांच्या मोटारसायकल ने घरातून निघाल्यावर राजवाडा परिसरातुन मार्गक्रमण करतांना तेथे पतंगीचा नायलॉन मांजा रफिक पठाण यांच्या नाकात अडकल्यामुळे धारदार मांजाने त्यांचे क्षणार्धात नाक कापले गेले.

हा घडलेला प्रकार पाहून जवळच उभ्या असलेल्या त्यांच्या पुतण्याने तातडीने त्यांना येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या नाकावर शस्त्रक्रिया करून सुमारे २५ टाके टाकले.रफिक यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईची गरज

नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आहे.त्यानंतरही शहर व परिसरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्याचे दिसते.नायलॉन मांजा पक्ष्यांनाच नव्हे तर माणसांनाही जीवघेणा ठरतो. पठाण यांच्यावर बेतलेला प्रसंग गांभीर्याने घेऊन स्थानिक प्रशासनाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक निर्बंध आणून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.