विधानसभा निवडणुकीत शरद पवार-राज ठाकरे एकत्र येणार !

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पवारांचं मार्गदर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (हरीश केंची) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला आणि भाजप-मोदी-शहा यांचा पराभव करण्याचा निर्धार व्यक्त केला. या त्यांच्या निर्धारात राज्यात आकाराला येणाऱ्या नव्या युतीची बीजे आहेत. मनसेचा येत्या ६ तारखेला मराठी नववर्षानिमित्त मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. या मेळाव्याला राज ठाकरे यांच्या बरोबरच राष्ट्रवादीचे शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभेनंतर होणाऱ्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-मनसे अशी युती होणार आहे. त्याचे संकेत या मेळाव्यात दिसून येतील. मराठीच्या मुद्द्यावर पूर्वी बाळासाहेब ठाकरे-शरद पवार हे एकत्र आले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती होतेय. ठाकरे-पवार त्याच शिवतीर्थावर एकत्र येत आहेत.

राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुका प्रत्यक्षपणे न लढविता मनसैनिकांनी भाजप, नरेन्द्र मोदी, अमित शहा यांच्याविरोधात काम करा असा थेट आदेश दिला आहे. त्याचा अप्रत्यक्ष अर्थ हा काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत असाच होतो. मराठी प्रसिद्धीमाध्यमांनी २०१४ च्या निवडणुकीनंतर ‘मोदी लाटेत मनसेचे सर्वत्र डिपॉझिट जप्त’ अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. परंतु मोदीलाटेतही अनेक लोकसभा मतदारसंघात लाख-सव्वालाख ते ८०-९० हजार मतं पडली होती. सफॉलोजीच्यादृष्टीने याचा अर्थ असा होतो की, मनसेनं स्वतःची आपली मतदारपेटी हळुवारपणे निर्माण केलीय. ज्यांच्यावर मोदीलाटेचा काहीच प्रभाव झाला नाही. मनसेची हीच मतं आणि जी मतं २०१४ मधील निवडणुकीत मोदीलाटेमुळे सेना-भाजपकडे वळली होती, पण सेना-भाजपच्या सत्ता काळाचा अनुभव पाहून पुन्हा मनसे किंवा त्यांच्या अप्रत्यक्ष सहयोगी मित्रांकडे वळल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला साहजिकच होणार आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं राज ठाकरे विधानसभा मतदारसंघात दौरे करतील आणि पक्षाच्या मतदारांच्या संपर्कात राहतील. ज्याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होईल.

sharad-pawar-&-Raj-Thackeray

काँग्रेस, हिंदी भाषकांचा दबाव ठोकरणार
महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा, राजकारणाचा विचार करता, असं लक्षांत येईल की, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष राज्यात नावपुरताच राहिला आहे. त्यांच्या स्थानिक नेतृत्वाचा राज्यभरात काडीचाही उपयोग होताना दिसत नाही. या उलट राष्ट्रवादी काँग्रेस उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. मात्र ते राज्यात काँग्रेसपक्षाच्या जाळ्यात अडकल्याने त्यांचा पक्षविस्तार खुंटला आहे. त्यामुळे एका राष्ट्रीय पक्षासोबत राज्यात अजून काही वर्षे नाईलाजाने चिकटून राहिल्यास राष्ट्रवादीचं भवितव्यही अवघड आहे. त्यात राज्यात काँग्रेसकडं चेहराच नाही. राज्यातील मतदार राहुल गांधी किंवा सध्याच्या गांधी परिवाराकडे आकर्षित होत नाहीत. शिवाय उत्तर भारतीय समाजाचा कांगावा करत काँग्रेस पक्ष स्वतःसोबत राष्ट्रवादीला देखील पुढं जाऊ देत नाही. वास्तविक राष्ट्रवादी पक्षाचा उत्तरप्रदेशात काहीच राजकारण नाही. बिहारमधील राष्ट्रवादी नेते तारिक अन्वर यांनी देखील पक्षाला रामराम केल्यानं तिथंही पक्षाला काहीच अस्तित्व नाही. त्यामुळं या हिंदीपट्ट्यातील मतांचा राष्ट्रवादीला कसलाच फायदा नाही. सध्या राष्ट्रवादीला महाराष्ट्र आणि गोव्याच्या राजकारणात भविष्य आहे. त्यामुळं शरद पवारांनी विधानसभेच्या अनुषंगाने राज ठाकरे यांच्यासारखा प्रभावी मोहरा स्वतःकडे खेचून विधानसभेच्यावेळी मोठा राजकीय भूकंप घडविण्याची योजना आखली आहे. महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसच्या जास्तीतजास्त ४-५ जागा निवडून येतील असं चित्र आहे. त्यामुळं राज्यातील काँग्रेसचं दखल घ्यावी असं महत्व राहणार नाही. हे शरद पवारांनी अचूक ओळखलं आहे त्यामुळं त्यांनी राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचलं आहे.

इतर छोट्या पक्षांना सोबत घेणार
या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचा आकडा १०-१२ पर्यंत नेऊन दिल्लीत पक्षाचं स्थान मजबूत करण्याची योजना पवारांनी आखली आहे. त्यानंतर २-४ महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी राज्यात राष्ट्रवादी-महाराष्ट्र नवनिर्माण सेना व इतर पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवतील असं सध्याचं वातावरण आहे. या नव्या युतीचा अनौपचारिक शुभारंभ मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात होईल. या मेळाव्यात शरद पवार यांचं मार्गदर्शन होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना मेळाव्याचं निमंत्रण दिलंय. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यासारखे धुरंधर राजकारणी एकाच व्यासपीठावर येऊन प्रचार करू लागले तर ग्रामीण आणि शहरी भागात कमीतकमी १०० जागा जिंकणं सहजशक्य आहे. त्यानंतर इतर लहान पक्षांना तसेच अपक्षांना सोबत घेऊन राजकारण करण्याची वेगळीच गणितं शरद पवार राज ठाकरे यांच्यासोबत आखत आहेत. असं राज्यातल्या आगामी राजकारणाचं चित्र असेल!

ग्रामीणभागात राष्ट्रवादी तर शहरात मनसे
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष राज्याच्या राजकारणात महत्वाचा असला तरी महत्वाच्या मुंबई महापालिका, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रबळ बनण्यासाठी राज ठाकरेंसोबत भविष्यातील रणनीती आखताना दिसत आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राज ठाकरे जातात तर अजित पवार हे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर जातात याला एक वेगळाच राजकीयदृष्ट्या संदर्भ आहे तो इथं घेतला पाहिजे. त्यामुळं उत्तरभारतीयांच्या मुद्द्यापेक्षा मराठीचा मुद्दा राष्ट्रवादी पक्षाला भविष्यात अधिक फायद्याचा ठरणारा आहे. राज ठाकरे यांचा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय हा अनेकांना चुकीचा वाटत असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादीसाठी खूप फायद्याचं ठरणारं आहे हे निश्चित !