लक्षवेधी ! भर उन्हाळयात ‘मावळ’मध्ये पैशाचा ‘पाऊस’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यामध्ये मावळ लोकसभा मतदार संघात थेट लढत होत असल्याने हा मतदार संघ लक्षवेधी बनला आहे. पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्यामध्ये काटे की टक्‍कर असल्याने दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार देखील करण्यात आला. प्रचाराची सांगता झाल्यानंतर देखील दोन्ही उमेदवारांचे समर्थक चांगलेच सक्रिय असल्याचे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाई वरून स्पष्ट झाले आहे. भरारी पथकाने शेकाप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे मावळमध्ये पैशांचा ‘पाऊस’ पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शनिवारी सायंकाळी कामोठे येथे पैसे वाटप करणार्‍या संदीप रामकृष्ण पराडकर आणि वैभव विठोबा पाटील यांना भरारी पथकाने पकडले होते. त्यांच्या विरूध्द गुन्हा देखील दाखल करण्यात आला. दोघेही शेकापचे कार्यकर्ते असल्याची माहिती तपासात समोर आली. त्यांच्याकडे 11 हजार 900 रूपये आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह, फोटो आणि नावांची यादी सापडली. शेकापचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा आहे. ही कारवाई होवुन 12 तास देखील झाले नाहीत तोवर आज (रविवार) सकाळी सुकापूर येथे मतदारांना प्रत्येकी 200 रूपये वाटत असताना भरारी पथकाने रामचंद्र आरेकर याला पकडले.

त्याच्याविरूध्द खांदेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरेकर हा देखील शेकापचा कार्यकर्ता आहे. ही कारवाई होवुन काही तास उलटले असतानाच पैसे वाटताना भरारी पथकाने शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पनवेल तालुक्यातील देवद येथुन ताब्यात घेतले. संजय हिरामण पाटील असे ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. संजय पाटील याच्याकडे 26 हजार 100 रूपये सापडले. पाटील याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती भरारी पथकाचे प्रमुख विनोद माहोरे यांनी दिली.

पैसे वाटताना आत्‍तापर्यंत 5 जणांविरूध्द भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघात पैशाचा ‘पाऊस’च पडतोय की काय अशी परिस्थित निर्माण झाली आहे. मतदार संघात मतदान सुरू होण्यास अद्यापही 12 तासांचा कालावधी बाकी आहे. त्यामध्ये आणखी पैसे वाटताना किती जणांवर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.