शिक्रापूर : अखेर सभापतीसह 25 जणांवर पोलीस ठाण्यात FIR दाखल

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर तालुक्यात एका लग्नाच्या तर एका वाढदिवसाच्या कार्यक्रमावर लॉकडाऊनचे नियमांचे उल्लंघन केला प्रकरणी शिरूर व शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले असताना करंदी ता. शिरूर येथे सभापती निवडीनंतर मोठी मिरवणूक काढण्यात आली होती त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाले होते. आता शिक्रापूर पोलिसांनी नवनिर्वाचित सभापतीसह पंचवीस जणांवर गुन्हे दाखल केले आहे. करंदी ता. शिरूर येथील रहिवासी असलेले शंकर जांभळकर यांची २९ जून रोजी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाली, त्यांनतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत केले, परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाने सर्व कार्यक्रमांवर बंदी घातलेली असून जास्त लोकांनी एकत्र येणे, गर्दी करणे यावर बंदी घालून तोंडावर मास्क बांधणे बंधनकारक केलेले आहे.

परंतु करंदी येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून तोंडावर मास्क न बांधता मिरवणूक काढून शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले होते, तर शिरूर तालुक्यातील वाढदिवस व लग्नाच्या मिरवणुकीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले असताना करंदी येथील मिरवणुकीबाबत पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती, याबाबतचे वृत्त पोलिसनामाने प्रसिद्ध केले होते, त्यांनतर आज शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस नाईक विलास आंबेकर, ब्रम्हानंद पोवार, अशोक केदार यांनी करंदी गावामध्ये जाऊन चौकशी करत मिरवणुकीबाबत माहिती घेत मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडीओ प्राप्त करून घेतले त्यामध्ये मिरवणुकीमध्ये युवकांनी तोंडावर मास्क न बांधता, गर्दी करून शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अशोक लहूजी केदार रा. शिक्रापूर ता. शिरूर जि पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती यांसह सुमारे 25 जणांवरती गुन्हे दाखल केले आहेत .सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.