शिरुर : पोलीस दलातील 3 बहिणींचे गृहमंञ्यांनी केले ‘कौतुक’

शिक्रापुर : प्रतिनिधी( सचिन धुमाळ) –  कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्र पोलीस दलात शिरुर तालुक्यातील इनामगाव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील तिन्ही बहिणी कर्तव्य बजावत असल्याने या बहिणींची राज्याचे गृहमंञी अनिल देशमुख यांनी दखल घेत ट्विटरद्वारे कौतुक केले आहे.

police

शिरुर तालुक्यातील इनामगाव हे शेवटचं गाव. वडील भरत म्हस्के यांचे शिक्षण सातवीपर्यंत, तर आई मंगल म्हस्के चौथी शिकलेल्या. या उभयतांना प्रतीभा, शुभांगी, स्मिता या तीन मुली झाल्या. तिघींच्या पाठीवर सिद्धेश्वर हा मुलगा. त्यानंतर मनिषा,कीर्ती, गिरिजा या मुली झाल्या. म्हस्के कुटुंबाचा शेतीवरच उदरनिर्वाह. परिस्थिती अत्यंत हलाखीची. तरीही यातील सर्व मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले.
सध्या शुभांगी पवार म्हस्के,गिरिजा म्हस्के,किर्ती म्हस्के या तिन्ही सख्या बहिणी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे.शुभांगी पवार म्हस्के या गुन्हे अन्वेषन विभाग पुणे येथे पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यरत आहे. तर गिरिजा या अतिक्रमण विभागात व किर्ती या कोंढवा वाहतुक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणुन कार्यरत आहेत.या तिन्ही बहिणी कोरोनाच्या संकट काळात मोठ्या धैर्याने संकटाचा सामना करत कर्तव्य बजावत आहे.तसेच त्यांची आई मंगल या गावच्या सरपंच म्हणुन कार्यरत असुन कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहेत.

दरम्यान राज्याचे गृहमंञी अनिल देशमुख यांनी ट्विट करुन पोस्ट द्वारे कोरोनाच्या संकटातही चांगलं काम करत असल्याबद्दल तसेच जिद्द व चिकाटीच्या जोरावर स्वत:च अस्तित्व निर्माण करणा-या बहिणींचं व शेतकरी आई वडिलांचं कौतुक वाटत असल्याबद्दल भावना व्यक्त करत कौतुक केले आहे.तर गृहमंञी अनिल देशमुख यांनी ट्विटर द्वारे कौतुक केल्यानंतर या तिन्ही मुलींच्या आई वडीलांनी आभार मानले आहे.