शिवसेना पुणे जिल्ह्यातून ‘हद्दपार’ ! विद्यमान मंत्र्यासह 2 आमदार ‘पराभूत’ ; भाजपचे टिळेकर, मुळीकांचा पराभव तर सोनवणे, गोरे बंडखोरीचे ‘शिकार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीमध्ये युतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला शिवसेना आणि भाजपच्या चांगलाच अंगलट आला. पुणे जिल्ह्यात जागा वाटपात शहरी भागातील ११ पैकी केवळ एक जागा आणि जिल्ह्यातील दहापैकी पाच जागा मिळालेल्या शिवसेनेचा सहाही जागांवर पराभव झाला आहे. यामुळे राज्यात भाजप- शिवसेना युतीची सत्ता आली असली तरी संपुर्ण पुणे जिल्ह्यातून शिवसेनेचा एकही आमदार विधानसभेत नसल्याने शिवसेनेचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्याचवेळी जागा वाटपात डावलले गेल्याने शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका पुणे शहर आणि जिल्ह्यात भाजपला बसला आहे. शिवसेनेच्या नाराजीमुळे भाजपच्या दोन विद्यमान आमदारांना घरी बसावे लागले असून अन्य मतदारसंघात दमछाक झाली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत तुटलेली भाजप शिवसेना युती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा आकारास आली. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे देशात मोठा भाउ ठरलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी मागील निवडणुकीत जो पक्ष जी जागा जिंकला आहे, ती जागा त्या पक्षाला व अन्य जागांचे यापुर्वीच्या मतांच्या आकडेवारीनुसार वाटप असे सूत्र ठरविले. राज्यातील काही अपवादात्मक जागांची अदलाबदल वगळता या सूत्रानुसार शिवसेनेला १२४ जागा तर भाजप व अन्य मित्र पक्षांना १६४ जागांचे वाटप झाले. पुणे शहरात आठही जागांवर भाजपचे आमदार असल्याने शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा आली नाही. अशातच पुर्वी युतीमध्ये असलेली इंदापूरची जागाही भाजपमध्ये दाखल झालेले कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांना दिल्याने नाराजीत अधिकच भर पडली. यामुळे मागील पाच वर्षांपासून तयारी करणार्‍या शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये प्रचंड खदखद निर्माण झाली होती. प्रमुख नेते युतीचे धर्मपालन करण्यासाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारात दिसत होते. मात्र, त्यांच्यामागे शिवसैनिक मतदार दिसत नव्हता. तर कसबा पेठ आणि चिंंचवड मतदारसंघामध्ये शिवसेनेने उघड बंडखोरी केली होती. या बंडखोरीला उत्तर म्हणून भाजपने शिवसेनेचे आमदार असलेल्या खेड आळंदी मतदारसंघात बंडखोरी केली होती.

याचा फटका भाजपला वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघामध्ये बसल्याचे पाहायला मिळत आहे. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनिल टिंगरे यांच्यामागे शिवसेनेची मोठी फौज होती. टिंगरे यांनी भाजपच्या मुळीक यांचा जेमतेम ५ हजार मतांनी पराभव केला.  मुळीक यांच्या पराभवामागील अन्य कारणांसोबतच शिवसेनेची नाराजी हे देखिल हे एक कारण आहे. हडपसर मतदारसंघातही भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांचा जेमतेम २ हजार ८०० मतांनी पराभव झाला आहे. जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी शिवसेने खूप प्रयत्न केले होते. परंतू भाजपने हा मतदारसंघ सोडला नाही. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून टिळेकर यांच्यावर असलेल्या नाराज शिवसैनिकांनी प्रचाराकडे पाठ फिरविली. याचा फटका टिळेकर यांना बसला आहे.

तर पिंपरीमध्ये शिवसेनेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना आव्हान दिल्याने भाजपमध्ये नाराजी पसरली. या लगतच्याच पिंपरी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार गौतम चाबुकस्वार यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी कात्रजचा घाट दाखविला. खेड आळंदी मतदारसंघात भाजपच्या अतुल देशमुख यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे यांचा पराभव झाला. तर जुन्नरमध्ये शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याने अपक्ष उभे राहीलेल्या आशा बुचके यांच्यामुळे शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांचा पराभव झाला. दुसरीकडे मंत्रीपद असताना जिल्ह्यातील शिवसेनेला वार्‍यावर सोडणारे शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. जिल्ह्यात जेमतेम सहा जागा लढलेल्या शिवसेनेची एकही जागा निवडूण आली नसल्याने जिल्ह्यातील शिवसेनेचे विधानसभेतील अस्तित्व संपुष्टात आले आहे.

Visit : Policenama.com