भीषण अपघातात शिवसेनेच्या माजी खासदाराच्या मुलाचा जागीच मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिरपूरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि नगरपालिका बांधकाम समितीचे सभापती तपन पटेल यांचा मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. तपन पटेल यांचं अपघाती निधन झाल्याने धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात शोककळा पसरली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, तपन पटेल हे आपल्या घराकडे परतत असताना, शिरपूर टोल नाक्याजवळ त्यांची गाडी दुभाजकावर जोरदार आदळली. या भीषण अपघातात तपन पटेल यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गाडीचा पुढचा भाग उध्वस्त झाला असून गाडीची चाके निखळली होती. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटूंबीयांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपन यांना मृत घोषित केलं.

तपन पटेल हे साळवदे येथील मुकेश कॅम्पमध्ये पाहुण्यांना सोडण्यासाठी गेले होते. पण घराकडे माघारी येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. गाडीचा वेग जास्त असल्याने तपन यांचा वाहनावरील ताबा सुटून गाडी दुभाजकावर आदळली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तपन पटेल हे शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांचे चिरंजीव तर माजी मंत्री अमरीश पटेल आणि उपनगराध्यक्ष भूपेश पटेल यांचे पुतणे होते. तपन यांनी वयाच्या अवघ्या ४० वर्षात राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी कीर्ती मिळवली होती.