शिवसेनेकडून फडणवीसांवर ‘टीका’ तर मोदींचं ‘कौतुक’, ठाकरे सरकारला ‘ही’ भीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (गुरुवार दि 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर शपथ घेतली. दरम्यान सामनाच्या अग्रलेखातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 5 वर्ष कारभार करताना फडणवीस सरकारनं राज्यावर 5 लाख कोटींचं कर्ज केलं आहे असा गंभीर आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

एकीकडे फडणवीस सरकारवर आरोप तर दुसरीकडे मोदी सरकारचं मात्र या अग्रलेखात कौतुक केल्याचं दिसत आहे. यात म्हटलंय की, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊ आहेत. केंद्र सरकारनं राज्य सरकारला मदत करायला हवी. मोदी हे देशाचे नेते आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सोबतीनं चालायला हवं असं सामनामध्ये म्हटलं आहे.

पुढे अग्रलेखात सरकारच्या डळमळीत करण्याला घेऊन चिंता व्यक्त केली आहे तर कुणी भगव्या ध्वजाशी वैर घेऊ नका असंही म्हटलं आहे. अग्रलेखात लिहिलंय की, महाराष्ट्रातील जनतेनं जो निर्णय दिला आहे त्याचा केंद्रानं आदर राखावा. सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न होणार नाही याची काळजी घ्यावी. भगव्या ध्वजाशी कोणी वैर घेऊ नका. भगव्या ध्वजाशी वैर घ्याल तर स्वत:चेच नुकसान करून घ्याल असा ईशारा देण्यात आला आहे.

सुराज्याचा उत्सव !
शिवरायांचे हे राज्य देशाचे मार्गदर्शक बनले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपलं सरकार आलं या भावनेतून आलेलं हे सरकार आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार सत्य व न्यायाच्या कसोट्यांवर उतरून स्थिरस्थावर होईल. 5 वर्षात राज्यावर 5 लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले आणि फडणवीस सरकार गेले. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प केले आहे त्यावर वेगाने पण सावधपणे पावले टाकावी लागतील.

पुढे लेखात म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं गतिमान विकास घडवावा असं आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे. त्यासाठी केंद्राची भूमिका सहकार्याची आहे. भाजप-शिवसेनेचं बिनसलं आहे परंतु नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील नातं भावाचं आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदींची आहे. पंतप्रधान एका पक्षाचे नसून ते पूर्ण देशाचे असतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दु:खाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल.

Visit : Policenama.com