कुणी ‘कॉलर’ उडवीत भाषण ठोकीत आहेत तर कुणी मतांसाठी भररस्त्यात ‘नाचू’ लागले आहेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकांच्या तारखा जवळ येत आहेत व प्रचाराचे नारळ जागोजागी फुटत आहेत. कुणी ‘कॉलर’ उडवीत भाषण ठोकीत आहेत तर कुणी मतांसाठी भररस्त्यात ‘नाचू’ लागले आहेत. असा उघड उघड टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे. पुढला महिनाभर मतदार हा ‘राजा’ असेल आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे नेते, गावोगावचे जाणते राजे हे मतदारांसमोर असे काही वाकलेले आणि झुकलेले दिसतील की विनम्रता या शब्दाची व्याख्याच बदलावी लागेल. असे देखील उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखात म्हंटले आहे.

‘बारामती’ही जिंकणारच !

चंद्रकांत पाटलांच्या म्हणण्यानुसार ‘बारामती’ही जिंकणारच ! दानवे म्हणतात, मराठवाडय़ांतील सर्व जागा जिंकू. मुख्यमंत्री विदर्भातले असल्यामुळे तेथील सर्वच जागा जिंकाव्या लागतील. गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्रातील ‘युती’च्या सर्व जागा जिंकण्याचे बोलत आहेत. मुंबई, कोकणातही वारे युतीचेच आहे व काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच ‘हाय’ खाल्ली आहे. काही ठिकाणी ते मैदानात उतरायला तयार नाहीत. आयाराम-गयाराम शब्दांना नवे तेज प्राप्त व्हावे अशी घाऊक पक्षांतरे सुरूच आहेत. महाराष्ट्रातील तालेवार घराणी, खानदाने सत्ताधारी पक्षांत सामील होत आहेत. अकलूजचे मोहितेपाटील घराणे, सांगलीचे वसंतदादा पाटलांचे घराणे, दिंडोरीचे पवार वगैरे खानदानी काँग्रेसवाले एका रात्रीत मनपरिवर्तन करून भाजपचे उमेदवार होत आहेत. साताऱयात अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे शिवसेनेचे उमेदवार झाले. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादीस घरघर लागली हे दिसत होतेच. शिवसेना-भाजपची युती होत नाही हे गृहीत धरून त्यांच्या डरकाळ्या व सत्तावाटप सुरू होते. मात्र, ‘युती’ची घोषणा होताच या दोघांचेही अवसान गळाले. असे सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे.

वंचितांची आघाडी म्हणजे निवडणूकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या

वंचितांची म्हणून जी काही आघाडी निर्माण झाली आहे त्याविषयी न बोललेलेच बरे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीवर देखील शाब्दिक तोफ डागली आहे. निवडणूकीपुरत्या उगवलेल्या त्यांच्या छत्र्या निकालानंतर अदृश्य झालेल्या दिसतील. असे उद्धव ठाकरे यांनी आपलया अग्रलेखात म्हंटले आहे.

देव, देश आणि धर्मासाठी म्हणूनच आम्ही ‘युती’ केली

इतक्या मोठय़ा देशात अनेक प्रश्न आहेत व भविष्यातही निर्माण होऊ शकतात. अशावेळी त्या प्रश्नांशी सामना करणारे सरकार मजबूत नसेल तर देश कोसळून पडेल. मोदी यांच्या बाबतीत विरोधकांचे आक्षेप असू शकतात, पण मोदी यांच्या तोडीचा एक तरी नेता ‘महागठबंधन’ नामक कोसळलेल्या डोलाऱयात आहे काय? कसायाच्या दारात उभ्या केलेल्या भाकड, भेदरलेल्या बैलासारखे नेते देश काय सांभाळणार? देव, देश आणि धर्मासाठी म्हणूनच आम्ही ‘युती’ केली व तो आमचा निर्णय योग्यच होता, हे कोल्हापुरातील उसळलेल्या विराट सभेने दाखवून दिले, असे देखील सामनातून मांडण्यात आले आहे.