पुण्यात बनावट नोटांचे रॅकेट चालविणार्‍या ‘या’ 6 जणांच्या टोळीचा पर्दाफाश ! 90 कोटीचे देशी अन् विदेशी बनावट चलन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील विमाननगर भागात लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी भारतीय चलनाच्या बनावट नोटांचा साठा केलेल्या टोळीला पकडले. यात एका लष्करी जवानाचा समावेश आहे. त्यांच्याकडून ४४ कोटी रुपयांचे बनावट चलन आणि ४ कोटी २० लाख रुपयांचे बनावट अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहे. एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेख अलीम गुलाब खान, सुनील भद्रीनाथ सारडा, रितेश रत्नाकर,  तौफिल अहमद मोहमंद इसाक खान, अब्दुल गनी रेहमतुल्ला खान, अब्दुल रेहमान अब्दुल गनी खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  विमाननगर येथील संजय पार्क परिसरात बनावट भारतीय चलन आणि अमेरिकन डॉलरचा मोठ्या प्रमाणावर साठा केल्याची माहिती लष्करी गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर गुप्तचर यंत्रणेने याची खातरजमा करत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला सोबत घेऊन ही कारवाई केली. या पथकाने सायंकाळी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, शेख अलीम गुलाब खान मुख्य सुत्रधार असून तो बॉम्बे सॅपियर्समध्ये कामाला असल्याची माहिती मिळाली.

एक वर्षभरापुर्वी त्याने संजय पार्क परिसरात एक बंगला भाड्याने घेतला होता. नागरिकांची फसवणूक करण्यासाठी चिल्ड्रेन बँकसाठी वापरण्यात येणाऱ्या नोटा एकत्रित करण्याचे काम तो बंगल्यामध्ये करीत होता. त्यानंतर नागरिकांना आमिष दाखवून फसवणूक केली जात होती. त्यासाठी कोंढव्यातील सुनील सारडा त्याला मदत करीत होता. त्यानंतर ठिकठिकाणी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी मुंबईतील रत्नाकर, तौफिल, अब्दुल, अब्दुल गनी बनावट नोटांची वाहतूक करीत होते. यातील शेख अलीम गुलाब खान हा लष्करात नाईक आहे. तो मुंबईत ड्युटीस आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान पथकातील सुनील पवार, गणेश साळुके, सुरेंद्र साबळे, दत्तात्रय फुलसुंदर, रमेश राठोड, सययद यांच्या पथकाने केली. फसवणूकीच्या उद्देशाने सहाजणांच्या टोळीने बनावट नोटांचा साठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. टोळीने बनावट नोटा कोठून आणल्या आहेत. तसेच त्यांनी किती जणांनी आतापर्यंत फसवणूक केली आहे, याची माहिती घेतली जात आहे.
बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा