‘या’ कारणामुळं लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर शरद पवारांचा सातारा दौरा रद्द !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आपला गड कायम राखला. अवघ्या 4 महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देत भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी जोरदार लढत दिली. त्यांनी उदयनराजेंचा 87,717 मतांनी दारुन पराभव केला आणि विजय मिळवला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह सर्वांना या विजयाचा खूप आनंद झाला.

यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचे मताधिक्य अर्ध्याने घटले होते. परंतु भाजपकडून पोटनिवडणूक लढवताना मात्र त्यांचा धक्कादायक पराभव झाला. या निवडणुकीत पवारांचा झंझावात प्रचार आणि पावसातील सभा हा चर्चेचा विषय ठरली. यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीचा विजय आणखी सोपा झाला. श्रीनिवास पाटलांच्या दणदणीत विजयानंतर शरद पवारांनी जाहीर केले होते की, मी उद्याच साताऱ्याला जाऊन तेथील जनतेचे आभार मानणार. सुप्रिया सुळे यांनीही याबाबत माहिती दिली होती.

विजयाच्या दिवशीच शरद पवार साताऱ्याला जाणार होते. परंतु काही कारणास्तव दुसऱ्या दिवशी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र दुसऱ्या दिवशीही पवारांनी सातारा दौरा रद्द केला. यानंतर मात्र श्रीनिवास पाटीलच बारामतीत पवारांच्या भेटीला आले. साताऱ्यात पाटलांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु साताऱ्यातील वातावरण पाहता पाटलांनी बारामतीत येत पवारांची भेट घेतली. त्यामुळेच पवारांचा सातारा दौरा रद्द झाला. पवारांनी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथे श्रीनिवास पाटील यांचा सत्कार केला.

Visit : policenama.com