काय सांगता ! होय, ‘या’ देशात 70 कोटी नारळांची कमतरता, मंत्र्यांनी केली झाडावर पत्रकार परिषद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  श्रीलंकेत सध्या नारळाची भयानक कमतरता आहे. म्हणजे असा देश जिथे दरवर्षी ३०० कोटी नारळाचे उत्पादन होते. येथे ७० कोटी नारळाची कमतरता भासत आहे. कोरोना कालावधीत या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी एक मंत्री झाडावर चढले.

श्रीलंकेचे राज्यमंत्री अरुंडिका फर्नांडो झाडावर चढले. तेथूनच त्यांनी झाडावर बसून पत्रकार परिषद घेतली. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मंत्री एका झाडाजवळ त्यांच्या समर्थकांसह दिसत आहेत. क्लिपच्या सहाय्याने झाडावर चढत आहेत. यानंतर त्यांनी झाडाचा नारळ तोडला आणि स्थानिक भाषेतच माध्यमांना संबोधित करण्यास सुरवात केली. मंत्री म्हणाले की, श्रीलंकेत लॉकडाऊन दरम्यान नारळाचा खप वाढला. ज्यामुळे याची कमतरता झाली आहे.

स्थानिक वेबसाइटनुसार, नारळाच्या झाडावर चढलेले श्रीलंकेचे राज्यमंत्री अरुंदिका फर्नांडो म्हणतात की, स्थानिक उद्योग आणि घरगुती वापराच्या मागणीमुळे श्रीलंकेत नारळाची कमतरता भासत आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी नारळाच्या शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी रिकामे प्लॉट वापरले जातील.

मंत्री फर्नांडो असेही म्हणाले की, नारळाच्या शेतीवर भर दिल्यास औद्योगिक विकासाला चालना मिळेल. तसेच परदेशी व्यापारातही वाढ होईल. ते म्हणतात की, सरकार नारळाच्या किंमतींवरही विचार करत आहे.

नारळाची कमतरता दूर करण्याबरोबरच त्याच्या किंमतीही कमी केल्या जातील. वेबसाइटवर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये मंत्री फर्नांडो आपल्या समर्थकांच्या मदतीने खाली उतरताना दिसत आहेत. सुमारे ५ मिनिटे ४२ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मंत्र्यांना झाडावर चढण्यासाठी ५८ सेकंद लागले.

मंत्र्यांना आपले भाषण संपल्यानंतर खाली उतरायला १ मिनिट आणि ३० सेकंदापेक्षाही जास्त वेळ लागला. ज्या क्लिपच्या माध्यमातून मंत्री झाडावर चढले, त्यापैकी एक खुर्ची देखील होती ज्यावर बसून मंत्र्यांनी माध्यमांना संबोधित केले होते.