अहमदनगर : शहरातील रस्त्यांची झालेली वाताहात, आयुक्तांच्या दालनाला शिवसैनिकांनी चिकटवले निवेदन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील रस्त्यांची अवस्था भयानक झाली असून, खड्ड्यांमुळे पायी चालणेही कठीण झाले आहे, त्यामुळे तातडीने खड्डे दुरुस्तीचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी नगरसेवक गाडे महापालिकेत आले होते. परंतु, आयुक्तांसह दोन्ही उपायुक्त व अन्य कोणीही वरिष्ठ अधिकारी तेथे उपलब्ध नव्हते. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आयुक्तांच्या दालनाला निवेदन चिकटवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, अतुल गाडे, प्रशांत बोरा, ऋषिकेश काकडे, शुभम पवार, शुभम गाडे, गिरीश शर्मा, संगमनाथ चांदकोटे आदी या वेळी उपस्थित होते. शहरात सध्याच्या स्थितीत रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे व यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. चांगल्या दर्जाचे पॅचिंग पावसाळा सुरू होण्याअगोदरच होणे अपेक्षित होते.

पावसाळ्याआधी जी थोडीफार पॅचिंग कामे झाली, तीही चांगल्या दर्जाची न झाल्यामुळे पुन्हा त्याठिकाणी खड्डे झाले आहेत. नागरिक कर भरतात आणि जनतेने भरलेल्या कराच्या पैशांतूनच महापालिकेची विकासकामे होतात. म्हणून ही कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत. दिल्ली गेट, न्यू आर्ट्स कॉलेज, पाइपलाइन रोड, गुलमोहर रोड, मिस्कीन मळा रोड, सर्जेपुरा तसेच शहरातील मध्य भाग व उपनगरांमध्ये ‘रस्त्यांमध्ये खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ते’ अशी स्थिती आहे. लवकरात लवकर नगर शहरातील रस्त्यांच्या पॅचिंगची कामे केली जावीत, नाहीतर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा या निवेदनात दिला गेला आहे.

Visit : Policenama.com