शिवसेनेच्या मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ही राज्य सरकार विरुद्ध भाजप असा सामना पाहण्यास मिळत आहे. भाजप नेते राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, गेल्या सात महिन्यांच्या कालखंडात पहिल्यांदाच शिवसेना नेते थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. शिवसेनेच्या मंत्र्याने विरोधी पक्ष नेत्याची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास निकटवर्तीय आहेत. अनिल परब हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी या बैठकिला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते.

आज विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे परब यांनी सांगितले. मात्र, गेल्या सात महिन्यात सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री हे थेट विरोधी पक्षाच्या नेत्याच्या भेटीला आल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. सुप्रीया सुळे यांनी ट्विट करून फोटो आणि माहिती शेअर केली होती.