सुमित्रा महाजन होणार महाराष्ट्राच्या नव्या राज्यपाल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या कन्या सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक बदल करण्यात आले असून अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. त्यामुळे आता अनेक राज्यातील राज्यपालांच्या देखील नियुक्त्या करण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यात सुमित्रा महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

पुढील महिन्यात महाराष्ट्रातील विद्यमान राज्यपालांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यास दिरंगाई केल्याने, सुमित्रा महाजन यांनी स्वत: नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणूक लढवणार नसल्याचेही जाहीर केले होते. त्यामुळे आता त्यांना राज्यपालपदी नेमून त्यांचे पुनर्वसन करण्याचा देखील प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.

सुमित्रा महाजन यांचे महाराष्ट्राशी ‘हे’ आहे नाते

सुमित्रा महाजन यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूनचा… त्यांचं कुटुंब काही वर्षांपूर्वी मुंबईत येऊन स्थायिक झालं. इंदूरच्या जयंत महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या इंदूरमध्येच स्थायिक झाल्या. त्यामुळे त्यांचा जन्म जरी महाराष्ट्रातला असला तरी त्यांची राजकीय कारकीर्द हि संपूर्णपणे मध्यप्रदेशातूनच राहिली आहे.

सुमित्रा महाजन यांनी भूषवलेली पदे :

जून २००२ : केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री
जुलै २००२ – मे २००३ : तंत्रान, माहिती आणि दुरसंचार राज्यमंत्री
मे २००३ – मे २००४ : पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्यमंत्री
२०१४ ते २०१९ – लोकसभेच्या अध्यक्षा

त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी व्यक्तीच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाल्यास आपल्याला आनंद होईल, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.