Pune : रिक्षा चालकांच्या मागण्यांना पाठिंबा : मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   रिक्षा चालकांना लॉकडाऊनच्या काळातील नुकसानभरपाई मिळावी, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी व्हावी अशा मागण्या रिक्षा पंचायतीने केल्या आहेत. या मागण्यांना पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी जाहीर केले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा चालक दिनांक १ऑक्टोबर रोजी दिवसभराचा संप करतील अशी घोषणा रिक्षा पंचायतीने केली आहे. या संपाला पाठिंबा असल्याचे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनच्या काळातील भरपाई म्हणून प्रत्येकी दरमहा चौदा हजार रुपये द्यावेत, रिक्षा वाहन कर्जाचे हप्ते राज्य सरकारने भरावेत, निर्बंधांमुळे चार महिने रिक्षा जागेवरच उभ्या होत्या. या काळातील विम्याच्या कालावधीला मुदतवाढ द्यावी, विम्याला मुदतवाढ नसेल तर तीन, चार हजार रुपयांचा परतावा मिळावा, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी अशा मागण्या रिक्षा पंचायतीने शासनाकडे केल्या आहेत. या मागण्यांना माझा पाठिंबा आहे. लॉकडाऊनच्या काळातही दैनंदिन चरितार्थ चालविण्यासाठी रिक्षा चालकांना प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात, दिनांक २५ एप्रिल रोजी मी, मुख्य मंत्र्यांकडे केलेली होती असेही मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ असावे या मागणीचा मी आमदार असताना पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले. मंडळ स्थापनही झाले. मंडळाचे स्वरुप, कार्यकक्षा ठरवून त्याची अंमलबजावणी होणे आता आवश्यक आहे. या मंडळामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायाला, जीवनाला स्थैर्य मिळू शकेल. त्यामुळे ही मागणी फार काळ प्रलंबित ठेवणे योग्य नाही असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.