खा. सुप्रिया सुळेंनी दिवे घाट अपघाताचा मुद्दा संसदेत केला उपस्थित

पालखीमार्ग चौपदरीकरण तातडीने व्हावे - सुप्रिया सुळे

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंंम्मदगौस आतार) – दिवे घाटामध्ये श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यात झालेल्या अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देहू आणि आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामांची आठवण करून दिली. या मार्गासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

पंढरपूरकडे निघालेला श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळा दिवे घाटात असताना मंगळवारी (दि. १९) अपघात झाला. अचानक एक जेसीबी पालखी सोहळ्यात घुसला आणि चालकाचा ताबा सुटून झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य १५ वारकरी जखमी झाले. अपघातात मरण पावलेल्या दोघांत श्री संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास यांचा समावेश आहे.

एकतर घाटमार्ग अत्यंत अरुंद आहे. शिवाय त्यावर खड्डे पडले असून वाहतूक अत्यंत संथगतीने चालते. जीव मुठीत धरून चालक वाहने चालवत असतात. अशी परिस्थिती असताना पालखी सोहळा येथून जात असताना घाटातील वाहतूक बंद ठेवण्याची गरज होती. ती बंद ठेवली नाही. एका बाजूने वाहतूक सुरूच असल्याने जेसीबीमुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचा आणि अन्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे सुप्रिया सुळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पालखी सोहळ्यात अपघात होणे ही बाब दुःखद असल्याचे नमूद करताना आळंदी-पंढरपूर आणि देहू पंढरपूर या पालखी महामार्गाचे काम रखडले असल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून दिले.

ना.गडकरी यांच्याकडे तातडीने पाठपुरावा
दिवे घाटातील कालच्या अपघातानंतर सुप्रिया सुळे यांनी तातडीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवले असून पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा. यासाठी पालखी मार्गाचे चौपदरीकरण तातडीने होण्यासाठी मागणी केली आहे.

दिवे या घाटात ठिकठिकाणी कठडे तुटले आहेत. रस्त्याची अवस्थाही बिकट आहे. भविष्यात अशा अप्रिय घटना टाळता याव्यात यासाठी कृपया पालखी महामार्गाचे रखडलेले काम तातडीने सुरु करुन ते पुर्ण करावे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Visit :  Policenama.com