अहो आश्चर्य! काँग्रेस नेत्याच्या समर्थनार्थ भाजपा ‘सरसावली’

कोलकत्ता : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मिडियावर राज्य सरकारवर टिका करणारी पोस्ट केल्याने पोलिसांनी काँग्रेस प्रवक्ता समान्य बंदोपाध्याय यांना अटक केली आहे. अटक केलेल्या काँग्रेस नेत्यांची पश्चिम बंगालचे भाजपाच्या प्रतिनिधी मंडळाने बंदोपाध्याय परिवाराची भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले. राज्यात आतंक माजविला असल्याची टिका भाजपाने केली आहे. जरा वेगळे वाटते ना पण हे खरे आहे.

देशभरात ज्या पद्धतीने मोदी सरकारविरोधात केवळ पत्र लिहिले तर त्यांच्यावर कारवाई होते. गुन्हा दाखल होतो, त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये सरकार विरोधात कोणी सोशल मिडियावर काही पोस्ट टाकली तर त्यांना अटक केली जात असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

पश्चिम बंगाल कॉग्रेसचे प्रदेश प्रवक्ता समान्य बंदोपाध्याय यांना गुरुवारी पुरलिया जिल्हा पोलीस ने उत्तर २४ परगणा जिल्हातील त्यांच्या घरी जाऊन अटक केली. त्यांनी राज्य सरकारवर टिका करणारी पोस्ट सोशल मिडियावर टाकली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भाजपाचे प्रदेश महासचिव जय प्रकाश मुजुमदार यांनी सांगितले की, केवळ राज्य सरकारवर टिका केल्याच्या कारणावरुन एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते, ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. आणीबाणीच्या वेळी अशी परिस्थिती होती़  असे वाटते की पश्चिम बंगालमध्ये आणीबाणी लागू केली आहे.

काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनीही या अटकेचा निषेध केला आहे. तृणमुल काँग्रेसचे वरिष्ठ नेता निर्मल घोष यांनी सांगितले की, बंदोपाध्याय यांना अटक केली. कारण त्यांच्याविरोधात अनेक गुन्हेगारी आरोप आहेत. राज्य सरकारवर टिका केल्याशी त्याचा काही संबंध नाही.