सुशीलकुमार शिंदे यांचे भावनिक आवाहन ; म्हणाले २०१९ ची निवडणूक शेवटची

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि सोलापूर मतदार संघाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी यंदाची निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत आता या निवडणुकीनंतर निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेचा खून केला
यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. बोलताना ते म्हणाले , डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जातीनिर्मुलनासाठी मोठे काम केले मात्र प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांनाच तिलांजली दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेचा खूनच केला आहे असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली.

यावेळी बोलताना सोलापूर मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात असणारे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावर देखील सुशीलकुमार शिंदे यांनी टीका केली. जातीय कारणामुळे जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मतांची विभागणी करण्यासाठी भाजपने ही खेळी खेळली आहे असे देखील सुशील कुमार शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

तसेच भाजपकडे विकासाचा कुठलाच टिकावू मुद्दा नाही, तुम्ही पाच वर्षात एकतरी टिकाऊ प्रोग्राम आणला का? असा सवाल यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपला उद्देशून बोलताना उपस्थित केला. ११० किलोमीटरवरून पाणी, पावर ग्रीड सारखे प्रोजेक्ट काँग्रेसनेच आणले. भाजपच्या एकतारी खासदाराने टिकाऊ प्रोजेक्ट आणले का ? असा सवाल यावेळी शिंदे यांनी उपस्थित केला.

सोलपूर लोकसभा मतदार संघात यंदाची लोकसभा मोठी उत्कंठा वाढवणारी आहे. कारण एकीकडे काँग्रेसकडून जेष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वंचित बहुजन आघाडी कडून प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या तिघांच्यात चुरस रंगणार असे दिसते आहे.