एल्गार परिषद : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्यासंबंधीचे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना पाठविले असून ते त्यांना शुक्रवारी २४ जानेवारी रोजीच मिळाले असल्याचे समजते. मात्र, त्याची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोमवारी एनआयएचे पथक या गुन्ह्याचा तपास ताब्यात घेण्यासाठी गेले असताना पुणे पोलिसांनी त्यांना तपासाची कागदपत्रे देण्यास नकार दिला. त्यामुळे या पथकाला रिकाम्या हाती परत जावे लागले होते.

राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक होत असून त्यात एल्गार प्रकरणाबाबत चर्चा होऊन महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी हे पत्र मंत्रालयात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पुढील आदेशासाठी सादर असे म्हणून पाठविल्याची माहिती आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख हे २६ जानेवारीला गोंदियाला होते. त्यानंतर गेले दोन दिवस ते नागपूर येथे आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ते पत्र सोमवारी पोहचले नव्हते.

अनिल देशमुख यांनी नागपूरहून बोलताना सांगितले की, एल्गार परिषद प्रकरणाच्या एनआयए तपासाबाबत माझ्याकडे गृहमंत्री म्हणून कोणतेही पत्र आलेले नाही. सरकारकडे पत्र आल्यानंतर आम्ही त्याची माहिती घेऊ. त्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ व त्यानंतर काय पावले उचलावयाची ते ठरवू, असे देशमुख यांनी सांगितले आहे.

एल्गार परिषद प्रकरणाचे राजकारण आता रंगु लागले असून त्यात भाजपाचे प्रत्येक माजी मंत्री केंद्राला सहकार्य न केल्यास राज्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीवजा भाषा वापरु लागले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्यानंतर आता माजी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशा प्रकारची भाषा सुरु केली आहे. एनआयएला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होईल, असे सांगितले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक व प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली होती. त्यात त्यांनी केंद्राच्या दबावाला बळी न पडता घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे भूमिका घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा