‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर अनेक वर्षाची परंपरा खंडित, कोल्हापूरातील शाही दसरा सोहळा रद्द

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन –   करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी करवीर संस्थानच्या राजघराण्याच्या वतीने दरवर्षी विजया दशमी दिवशी होणारा शाही सीमोल्लंघन सोहळा यंदा रद्द केला आहे. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आला आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अनेक वर्षानंतर प्रथम हा सोहळा खंडित होणार आहे. शाही सीमोल्लंघन होणार नसल्याने करवीरकरांनी मनातून आनंद घ्यायचा आहे. पुढील वर्षी हा सोहळा अधिक उत्साहाने साजरा करण्यात येईल असे ते म्हणाले.

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात दरवर्षी शाही दसरा सोहळा होतो. सोहळ्यास अंबाबाई, तुळजाभवानी व गुरू महाराज पालखीसह छत्रपती घराण्यातील सर्वजण शाही गणवेश परिधान करून मेबॅक या गाडीतून लवाजम्यासह चौकात दाखल होतात. याठिकाणी मोठ्या गर्दीच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा पारंपारिक कार्यक्रम होतो. म्हैसूर आणि करवीर या दोन संस्थानच्या वतीने होणारा हा सोहळा गेले अनेक वर्षे सुरू आहे.

मात्र यंदा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर बंद आहे. धार्मिक विधी सुरू असले तरी भाविकांना उपस्थित राहण्यास मनाई आहे. रात्री निघणारी पालखी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत काढली जाते. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्णय घेतले आहेत.