तंबाखू सेवनाचे वय सरकार वाढवणार, आई-वडीलांनी गुटखा आणण्यासाठी पाठवले तर खैर नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात तंबाखू सेवनासाठीचे वय 18 वर्षावरून वाढवून 21 वर्ष करणे आणि या संबंधीच्या नियमांच्या उल्लंघनाच्या दंडाची रक्कम वाढविण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय यासाठी सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादनाचे नियम आणखी कडक करण्याचा विचार करत आहे. सीओटीपीएचे नियम कडक करून तरूणांना तंबाखूच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवणे, हा सरकारचा यामागील हेतू आहे.

यासंबंधी एका अधिकार्‍याने सांगितले की, बहुतांश लोक तरूणपणीच धुम्रपान करण्यास सुरू करतात. 18 ते 21 वर्षांच्या वयातील युवकांवर याचा लवकर प्रभाव पडतो. अनेकजण फॅशन म्हणून सिगारेट पितात. तंबाखू सेवनाचे कायदेशीर वय 21 केल्यास तरूण वयात तंबाखू सेवन करणार्‍यांच्या संख्येत घट होऊ शकते. एवढेच नव्हे, तर आई-वडीलदेखील आपल्या 21 वर्षाखालील मुलांना ही उत्पादने खरेदी करण्यासाठी दुकानांवर पाठवू शकणार नाहीत. आरोग्य मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तंबाखूच्या नियंत्रणासाठी कायद्यात बदल करण्यासाठी एक कायदा उपसमिती स्थापन केली आहे.

अधिकार्‍याने सांगितले की, समितीने तंबाखू सेवन करण्याचे कायदेशीर वय वाढवण्यासोबतच दंडाची रक्कम वाढविण्याची शिफारस केली आहे. यासोबतच सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांचा अवैध व्यवसाय रोखण्यासाठी देखरेखीची व्यवस्था तयार करण्याची शिफारस केली आहे.

तंबाखू उत्पादनांवर आता बारकोड
देखरेख व्यवस्थेअंतर्गत तंबाखू उत्पादनांवर बारकोड लावला जाणार आहे, ज्याद्वारे संबंधीत एजन्सीला उत्पादन कायदेशीर आणि योग्य असल्याचे समजू शकते. तसेच टॅक्स दिला आहे किंवा नाही हे समजू शकते.

प्रतिबंधित क्षेत्रात धूम्रपान करण्यासंबंधी दंडाची रक्कम वाढणार

प्रतिबंधित क्षेत्रात धूम्रपान केल्यास असलेल्या दंडाची रक्कम वाढविण्यावर सुद्धा विचार सुरू आहे. हा दंड सध्या 200 रूपये आहे. सीओटीपीए अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे, शिक्षण संस्थामध्ये 100 मीटरच्या परिसरात तंबाखू उत्पादने विकणे आणि 18 वर्षाखालील वयाच्या व्यक्तींना तंबाखू उत्पादने विकण्यास मनाई आहे.