रेल्वेकडून आली महत्त्वाची माहिती, 1 जूनपासून सुरु होऊ शकतात ‘एक्सप्रेस’ ट्रेन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशातील रेल्वे सेवा मागील दोन महिन्यापासून बंद आहे. देशातील विविध राज्यात अडकलेल्या मजूरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी रेल्वेने विशेष रेल्वे सुरु केल्या. रेल्वे सेवा सुरु झाल्यापासून 2600 गाड्या सोडण्यात आल्या आणि त्याचा फायदा 35 लाख लोकांना झाला. 35 लाख लोक आपल्या घरी पोहचू शकले, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी दिली.

रेल्वेने ज्या 35 लाख लोकांना घरी सोडले आहे त्यामध्ये 80 टक्के कामगार म्हणजेच 28 लाख लोक देशभरातून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पोहचले असल्याची माहिती विनोदकुमार यादव यांनी दिली.1 मे पासून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आल्या. तेव्हापासून 2600 फेऱ्या झाल्या आणि 35 लाख कामगार आपापल्या घरी गेले. पुढच्या 10 दिवसांत आणखी 2600 गाड्या सोडण्यात येतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. राज्यानं मागणी केल्यास त्या त्या राज्यासाठीही रेल्वे सोडण्याचा विचार करण्यात येईल, असंही विनोदकुमार यादव यांनी सांगितलं.

रेल्वेने प्रवास करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे. श्रमीक ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्वांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणं बंधनकारक आहे. रेल्वे स्टेशनवर सगळ्यांची तपासणी होईल आणि आजाराची लक्षणं दिसत नसतील तरच त्यांना प्रवासाची अनुमती देण्यात येईल.