थेट न्यायाधीशांना नावे ५० हजारांची लाच स्विकारणाऱ्या ‘त्या’ वकिलाचं होणार काय ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना अँटी करप्शनच्या पथकाने वकिलाला रंगेहात पकडले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने वकिलाला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. परंतु थेट न्यायाधीशांच्याच नावे लाच मागणाऱ्या या वकिलाचं नेमकं होणार काय? पोलीस कोठडीतील चौकशीत आणखी काही धागेदोरे हाती लागतील की त्याला जामीन होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अ‍ॅड. शिवराज पाटील ( वय ३०, रा. निगडी, ता. कराड) असे अटक करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे.

निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी ग्राहक न्यायालयातील न्यायाधीशाला लाच द्यावी लागेल असे सांगून अ‍ॅड. पाटील यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपये मागितले. त्यानंतर याची तक्रार तक्रारदाराने अँटी करप्शनकडे केली. तक्रारीची पडताळणी केल्यावर त्याने लाच मागितल्याचे समोर आले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना बुधवारी सकाळी अ‍ॅड. पाटील याला सातारा ग्राहक न्यायालयाच्या बाहेर रंगेहात पकडण्यात आले.

याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून एसीबीने न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र पाटील याने थेट न्यायाधीशांच्याच नावे लाच मागितल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणात त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी आहे का ? याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी एसीबीने केली. मात्र एसीबीला यातून काही मोठं हाती लागेल की त्याला जामीन मिळेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.