सत्ता गेल्याचं नाही, पण उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वागण्याच कायम दु:ख : देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केले. या मुलाखती दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना म्हणाले, सत्तेत असताना पाच वर्षे उद्धव ठाकरे यांचा शब्द मी खाली पडू दिला नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट मान्य केली. पण निकालानंतर त्यांनी माझे फोनही घेतले नाहीत. बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला. मला सत्ता गेल्याचं दु:ख नाही तर उद्धव ठाकरे यांच्या या वागण्याचे दु:ख आहे अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्याने भाजपला मोठा धक्का बसला. तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वालाही त्यामुळे हादरा बसला.

महाविकास आघाडी सरकारच्या काही महिन्यानंतर त्याची चर्चा अद्यापही सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार राजू पुरुळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे.

फडणवीस म्हणाले, 2019 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्ता बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट सिग्नल होता. दोन बैठका झाल्या होत्या. त्यातील एका बैठकीला मी होते एकाला नाही. त्या बैठकीनंतरच दोघांनी मिळून पुढे जायचं ठरलं होतं. भाजप सोबत जायचं हा निर्णय काही एकट्या अजित पवारांनी घेतला नाही. तर हा निर्णय हा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा होता असा खुलासा त्यांनी केला. यावेळी फडणवीस यांनी नाव न घेता सरळ शरद पवारांच्या सांगण्यावरूनच अजित पवार भाजपला मिळाले असं थेटपणे सूचित केले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने असता तर माझं आणि अजित पवारांच सरकार शंभर टक्के टिकलं असतं असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार दोन वर्षापूर्वीच बनले असते. पण काही गोष्टी जुळून येऊ शकल्या नाहीत असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सत्तेत असताना उद्धव ठाकरेंची एकही गोष्ट अव्हेरली नाही. त्यामुळे त्यांच्या वागण्याचा सात्विक संताप आला असंही त्यांनी सांगितलं.सत्ता गेल्यानंतर दोन दिवस आपली सत्ता गेली हे पटतच नव्हतं. मात्र ती जाणीव व्हायला जास्त वेळ गेला नाही असेही फडणवीस यांनी सांगितलं.