कांद्याची अघोषित निर्यात बंदी ? 500 कंटेनर कांदा मुंबई बंदरात थांबवला !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये पंधरा दिवसांमध्ये 45 टक्कयांनी वाढ झाल्याचे लक्षात येताच केंद्राकडून कांदा निर्याती बंदी बाबत हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे मुंबई पोर्ट मध्ये पाचशे ते सहाशे कंटेनर निर्यातीकरिता पोचलेले असताना गेल्या दोन दिवसांपासून कंटेनर हे थांबवण्यात आले आहे. या ५०० कंटेनरमध्ये ५० कोटी रुपयांचा साधारणत: पंधरा हजार मेट्रिक टन कांदा असून बंदरावर निर्यातीविना अडकून पडलेला आहे. केंद्राने कांदा निर्यातीबाबत काही शेतकरी विरोधी धोरण घेतल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: ठप्प होण्याचे शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. कोणतीही माहिती न देतात मुंबई बंदरावर कंटेनर उभे असल्याने व्यापारी वर्गांमध्ये हे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक, मध्यप्रदेशसह इतर राज्यातील कांदा पावसामुळे खराब झाल्याने त्याची आवक बाजारपेठेत होऊ शकलेली नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्य़ातील कांद्याची मागणी वाढल्याने कांदा ३ हजाराच्या पुढे गेलेले आहे. अनलॉक ४ मध्ये हॉटेल व्यवसाय पूर्णता सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने आता कांद्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांदा दरात सुधारणा होऊ शकेल असा अहवाल केंद्राकडे गेल्याने मुंबई पोर्टवर ५०० कंटेनर हे थांबवून ठेवण्यात आलेले आहे. केंद्र सरकार कांद्यावरील किमान निर्यात मूल्य दर वाढविण्याची तयारी करत असल्याचे यावरून दिसून येत आहे जर केंद्र सरकारने असा शेतकरीविरोधी निर्णय घेतल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाकडून रेल रोको आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया भारत दिघोळे यांनी दिलेली आहे

कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात मूल्य दरात वाढ, निर्यातबंदी करणे असे निर्णय घेऊ नये. मुळात चाळीत साठवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे या मिळणाऱ्या दरातून कुठेतरी झालेला खर्च भरून निघण्यास आम्हाला मदत होणार आहे.
– रामभाऊ भोसले, कांदा उत्पादक शेतकरी

सध्या बाजारात येणारा कांदा मार्च महिन्यापासून चाळीत साठवलेला आहे.तो बराच काळ साठवलेला असल्याने कांद्याचे वजन घटल्याने मिळणाऱ्या भावातून शेतकरी वर्गाचा झालेला खर्च आणि तोटा आत कुठे तरी निघण्यास सुरुवात झाल्याचे शेतकरी बोलत आहे .त्यामुळे कांद्याचे दर पाडण्यासाठी शासनाने आयात करणे, निर्यातबंदी करणे असे न करता जे काही शेतकऱ्यांना मिळत आहे ते मिळू द्यावे अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल असा इशारा वजा विनंती कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
– निवृत्ती न्याहारकर