भविष्यात भाजप-शिवसेना युती, BJP च्या ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

राहता : पोलीसनामा ऑनलाइन – कही पे निगाहे, कही पे निशाना हा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकारणातील स्वभाव आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त शनिवारी त्यांनी शहरातील कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला निमंत्रित म्हणून शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी हजेरी लावली होती. विखे पाटील हे चांगले प्लॅनर आहे, असे विधान लोखंडे यांनी केले. त्यानंतर विखे पाटील यांच्या डोक्यात काय प्लान सुरु आहे असा प्रश्न उपस्थितांना पडला होता.

खासदार सदाशिव लोखंडे यांच्यानंतर विखे पाटील म्हणाले, तुम्ही युतीचे खासदार म्हणून निवडून गेलात, आता महाविकास आघाडीचे खासदार झालात. हरकत नाही, कुणी सांगावे, आपली पुन्हा युती देखील होईल. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांचा भुवया उंचावल्या. कोविडमुळे अर्थकरण थंडावले, राजकारण नाही. एरवी फारसे एकत्र न येणारे हे दोन नेते अनपेक्षितपणे एकत्र आले. त्यामागे काही तरी कारण असणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

लोखंडे यांनी विखे यांचा उल्लेख चांगला प्लॅनर असा केला. श्रीरामपूर नगर पालिकेची निवडणुक वर्षभरावर आली. त्यामुळं त्यांनी सोंगट्या टाकण्यास सुरुवात केली नाही ना असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण लोखंडे यांचे या पालिकेच्या राजकारणात फारसे स्थान नाही. बोलणी करायची वेळ आली तर शिवसेनेपुरती त्यांची भुमिका महत्त्वाची ठरु शकते. विखे पाटील यांची श्रीरामपूर शहर व मतदारसंघावर बारीक नजर आहे. त्यामुळे त्यांना एका दगडात तीन पक्षांची शिकार करायची आहे.