आगामी 48 तास महत्वाचे ! विदर्भ, मराठवाड्यासाठी अवकाळी पावसाचं पुन्हा ‘संकट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मराठवड्यासह विदर्भात गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. बंगालच्या उपसागरातून अग्नेय दिशेनं वाहणारे वारे आणि अरबी समुद्राकडून येणारे वारे यांच्यामुळे हवामानात बदल होणार आहे. त्यामुळे पुढील 48 तासात नागपूर, अकोला, औरंगाबाद जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे.

मुंबईसह कोकण भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. मुंबईच्या उपनगरभागात तुरळक पावसाची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, डहाणू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे येथील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवस मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.

आज नागपूरमध्ये तापमानाचा पारा 5 अंशापर्य़ंत खाली गेल्याने नागपूरकरांना चांगलीच हुडहुडी भरली. पुढील 48 तास विदर्भ मराठवाड्यात रात्री तापमानाचा पारा खाली घसरण्याची शक्यता आहे. तर दिवसा ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आधीच महिनाभर थंडी येण्यासाठी उशीर झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यात अवकाळी पावसामुळे संत्री, गहू, हरबरा यांसारख्या पिकांचे नुकसान होऊ शकते. तर या अवकाळी पावसानंतर थंडीचा कडाका वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरवर्षी या काळात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पारा खाली येतो. सध्या काश्मीरमध्ये हिमवर्षाव होत असल्याने त्याचाही परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/