विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा !

पोलिसनामा ऑनलाईन – हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढच्या 24 तासांत मराठवड्यासह विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या-मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नांदेड, लातूर, बीडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल मनमाड, येवला, भागात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. पावसामुळे अनेक परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या 24 तासांत विदर्भ आणि कोकणातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये ऊन आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.