पश्चिम बंगाल, ओडिशाच्या किनारपट्टीला ‘बुलबुल’ चक्रीवादळाचा तडाखा, दोघांचा मृत्यू

कोलकत्ता :  वृत्तसंस्था – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या बुलबुल चक्रीवादळ आज सकाळी पश्चिम बंगाल, ओडिशाच्या किनारपट्टीला धडकेल असून किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून पश्चिम बंगालमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे बांगला देशातील किनारपट्टीलगतच्या काही लाख लोकांना हलविण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोलकत्ता विमानतळ १२ तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ओडिशातील जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी चक्रीवादळामुळे झाडे, वीजेचे खांब कोसळले असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. भद्रक जिल्ह्यात काली भांजा डीहा द्वीपाजवळ एक मच्छिमार बोट बुडाली. सुदैवाने बोटीतील सर्व मच्छिमारांना वाचविण्यात आले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बुलबुल चक्रीवादळ आणखी काही तास घोघावत राहणार आहे. सध्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहत आहेत. त्यानंतर रविवारी सायंकाळी त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होऊन त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.