हेमा मालिनींचा गहू कापणीनंतर आता ‘ट्रॅक्टर’ स्ट्रोक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लोकसभा निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे उमेदवार प्रचारासाठी नवनवे फंडे वापरतांना दिसत आहेत. त्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप उमेदवार हेमा मालिनी या अग्रेसर दिसत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्या कधी शेतात कापणी करतांना दिसल्या तर आज चक्क त्यांनी शेतात ट्रॅक्टर चालवून मतदारांचे लक्ष वेधले. त्यांचा हा प्रचाराचा हटके स्ट्रोक सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.

हेमा मालिनी उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. आज त्या मथुरेतील गोवर्धन भागातील एका शेतामध्ये ट्रॅक्टर चालवत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत त्या गॉगल लावून ट्रॅक्टर चालवत आहेत, तसेच ‘व्हिक्ट्री’ चिन्ह दाखवताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाला.

दरम्यान, हेमा मालिनी यांनी मथुरा मतदारसंघात आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. त्यांनी प्रचाराची सुरवात थेट गव्हाच्या शेतापासून केली. हेमा यांचा प्रचाराचा हा फंडा तेव्हाही चर्चेचा विषय बनला होता. त्याचेही फोटो सोशल मीडियामध्ये प्रचंढ व्हायरल झाले होते.