विधानसभा 2019 : पर्वती मतदार संघात विरोधक एकत्र आल्याशिवाय भाजपला ‘टक्कर’ देणं अवघडच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी पुन्हा पर्वती मतदारसंघातूनच उमेदवारी मागितली आहे. यामुळे तुर्तास तरी भाजपमधील इच्छुकांना यंदाही पुन्हा मुरड घालावी लागणार अशी चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान, विरोधी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या मतदारसंघातून तयारी सुरू केली असून या दोन्ही पक्षांच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार? यावर लढतीचे चित्र अवलंबून राहाणार आहे.

पुर्वी आरक्षित असलेल्या पर्वती मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे प्राबल्य होते. परंतू १९९५ नंतर दिलीप कांबळे, विश्‍वास गांगुर्डे यांच्या रुपाने भाजप- सेना युतीला यश मिळाले. यानंतर मात्र पुन्हा रमेश बागवे यांच्या रुपाने कॉंग्रेसने हा मतदारसंघ खेचून घेतला. दहा वर्षांपुर्वी मतदार संघाच्या फेररचनेमध्ये पर्वती मतदारसंघातील आरक्षण उठले आणि युतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ या विजयी झाल्या. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना व आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र निवडणुक लढले. यामध्ये मिसाळ यांनी मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा पर्वतीचा गड राखला.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीचे बहुमताचे सरकार सलग दुसर्‍यांदा सत्तेवर आल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठी चपराक बसली आहे. राज्यस्तरावर दोन्ही पक्षांची अवस्था बिकट असून पुण्यातही फारसे वेगळे चित्र नाही. भाजप आणि शिवसेनेची आगामी निवडणुकीत युती होणार असल्याचे दोन्ही पक्षाचे नेते सांगत असले तरी अन्य पक्षांपेक्षा शहरात भाजपची ताकद वाढली आहे. परंतू आगामी महापालिका निवडणुकीतील गणिते पाहाता जर राजकारणात टिकून राहायचे असेल तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला मित्र पक्षांची संख्या वाढवून लढत देण्याशिवाय फारसे पर्याय नाहीत.

विशेष असे की या दोन्ही पक्षांकडे भाजपला एकास एक टक्कर देणारे उमेदवार नक्कीच आहेत. परंतू त्यांच्यातील बेबनाव आणि एकमेकांप्रतीचा अविश्‍वासामुळे एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाणे तितकेसे सोपे नाही.

भाजपकडून माधुरी मिसाळ याच उमेदवारीच्या प्रमुख दावेदार असून दहा वर्षांपासून विधानसभेची स्वप्न पाहाणारे भाजपचे महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर हे देखिल तयारीला लागले आहेत. तसेच जर युती झालीच नाही तर शिवसेनेकडून नगरसेवक बाळा ओसवाल, माजी नगरसेवक अशोक हरणावळ यांच्यासोबतच अन्य पक्षांतून आयात उमेदवारालाही संधी दिली जावू शकते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेविका माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्‍विनी कदम व कॉंग्रेसकडून आबा बागुल, अभय छाजेड यांनी तयारी सुरू केली आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये संपुर्ण मतदारसंघामध्ये भाजपचे प्राबल्य अधिक असले तरी व्यावसायातील मंदी, बेरोजगारी आणि जीएसटीमुळे दुखावलेला वर्ग काय भुमिका घेतो, हे पाहाणेही महत्वाचे ठरणार आहे.

Visit : policenama.com