काय सांगता ! होय, त्यानं चक्क कॉन्फरन्स कॉलवरच पत्नीला दिला तीन तलाक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईलवर कॉन्फरन्स कॉल सुरु असतानाच पत्नीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

तलाक दिलेली महिला ही कांदिवली येथील रहिवासी असून तिचे लग्न एप्रिल २०१८ मध्ये झाले होते. ती आपल्या पतीसोबत कळंबोली येथे राहत होती. सासू – सासऱ्यांसोबत भांडण झाल्यामुळे महिला आपल्या आई-वडिलांकडे राहण्यास आली होती. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी म्हणून महिलेच्या बहिणीने पीडित महिलेच्या नवऱ्याला फोन केला होता. तिघे जण मोबाईल वर कॉन्फरन्स कॉल वरती बोलत होते, तेव्हाच अचानक पीडित महिलेच्या नवऱ्याने तीन तलाक दिल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे.

माझ्या आई-वडिलांनी माझ्या सासू आणि सासऱ्यांच्या मागणीनुसार नवऱ्याला एक गाडी आणि राडो घड्याळ भेट दिले होते. लग्नाच्या काही दिवसांनी नवऱ्याने पैसे मागायला सुरुवात केली. रोजच्या मानसिक आणि शारीरिक तणावामुळे माझा गर्भपातही झाला, यासाठी सासू-सासऱ्यांनी मलाच दोषी ठरवलं आणि माहेरून पैसे आणण्याची जबरदस्ती केली, असं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. डिसेंबर २०१८ मध्ये गर्भवती राहिल्यानंतर माझा गर्भपात झाला होता, असं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.