पाकिस्तानी खेळाडू परवानगी न घेता गेला हॉटेलबाहेर, झाली स्पर्धेतून हकालपट्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   पाकिस्तानमध्ये स्थानिक क्रिकेटमधील प्रतिष्ठेची मानली जाणारी Quaid-e-Azam ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत सहभागी असलेला पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू रझा हसन याने कोविड-१९ चे नियम मोडल्याप्रकरणी त्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हकालपट्टी केली आहे. संघाच्या मेडिकल टीमची परवानगी न घेतल्याशिवाय रझा हसन Bio Secure Bubble मोडून हॉटेल बाहेर गेला होता.

यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे High Performance Director नदीम खान म्हणाले, “सातत्याने सूचना करुनही आणि कोविड-१९ बाबाबत अनेक उपक्रमांमधून माहिती प्रसिद्ध केल्यानंतरही रझा हसनने Bio Secure Bubble चे नियम मोडले. ही खरचं शरमेची बाब असून, आपला आणि आपल्यासोबत अन्य सहकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात घालत रझा हसन हॉटेलबाहेर गेला. त्याच अनुषंगाने त्याची हकालपट्टी केली आहे. उर्वरित हंगामात तो सहभागी होऊ शकणार नाही.”

रझा हसनने २०१२ साली टी-२० क्रिकेटमधून पदार्पण केले होते. २०१२ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याची पाकिस्तानच्या संघात निवड करण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रोलियाविरुद्ध झालेल्या सामन्यांत हसनने ४ षटकांत १४ धावा देत शेन वॉटसन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांचा बळी घेतला होता.