Coronavirus : पोलिसांचा होणार ‘सन्मान’

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाच्या हाहाकारात पोलिस दल 24 तास रस्त्यावर उभा राहून काम करत असून, राष्ट्रीय आपत्तीच्या काळात चांगली कामगिरी बजावलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती सेवा पदक अथवा इतर पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ गृहविभागाकडे पाठविण्याच्या सूचना महासंचालक कार्यालयास दिल्या आहेत. गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी हा आदेश काढला आहे. यामुळे पोलिसांनी केलेल्या कामाचे एक प्रकारे कौतुक होणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस व आरोग्य विभाग तो रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नागरिक रस्त्यावर बाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे पालन करण्यासाठी पोलिस 24 तास काम करत आहेत. पोलिस कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात देखील काम करत आहेत. कर्तव्य बजावत असताना पोलिसांना करोनाची लागण देखील होत आहे. कुटुंबाचा विचारन न करता व जीवाची बाजी लावून कोरोनाच्या लढ्यात काम करत आहेत.

पोलिस दलात चांगले काम केल्यानंतर त्यांना रिवॉर्ड, अथवा एखादे पदक देऊन गौरविले जाते. पोलिस दलात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालाक, राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात येते. तसेच, पोलिस दलात पदक मिळणे हे देखील एक गौरवास्पद गोष्ट असते.

कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून त्यामध्ये पोलिस कायदा सुव्यवस्था राखणे, सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूंना मदत करण्याचे काम पोलिस करत आहेत. या लढ्यात मुख्यत्वे पोलिस शिपायापासून ते निरीक्षकांपर्यंतचे रस्त्यावर उतरून काम करत आहेत. काहींना मृत्यूला देखील सामोरे जावे लागले आहे. तरीही पोलिस दल काम करत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपत्ती सेवा पदकाने गौरविण्याचा प्रस्ताव तत्काळ पाठवावा, अशा सचूना महासंचालक कार्यालयास गृहविभागाने दिल्या आहेत.