डॉ. सुजय यांच्या उमेदवारीला सेना-भाजप आणि राष्ट्रवादीचा कडाडून विरोध

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादी तयार नाही. तर दुसरीकडे डॉ. सुजय विखे पाटील हे लोकसभेची निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. त्यामुळे आता यावर मध्यम मार्ग म्हणून डॉ. सुजय विखे हे दुसऱ्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवतील हा मुद्दा पुढे आला आहे. या राजकीय घडामोडीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे पूर्वीपासून आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत व तीन मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. उलट नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही आमदार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा सोडायला तयार नाही. डॉ. सुजय विखे पाटील गेल्या तीन वर्षापासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तयारी करीत आहे. उमेदवारी दिली नाही, तरी निवडणूक लढवणारच यावर ते ठाम आहेत. दरम्यान, ३ वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार या जागेवरून पराभूत झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच काँग्रेस ही जागा मागत आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध

सुजय विखे यांना उमेदवारी देण्यास कार्यकर्ते अनुकूल नाहीत. गावागावात विखे गट निर्माण करण्याचा सुजय यांचा प्रयत्न राहिला आहे. ते ग्रामपंचायत ते तालुका पातळीवरील निवडणुकांमध्ये लक्ष घालतात. त्याचा त्रास सर्वांनाच होईल. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांना कळविले आहे, असे सांगितले जात आहे.

भाजपाकडून विरोध

काँग्रेसला जागा सुटत नसल्याने विखे यांनी सेना- भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. परंतु, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विखे यांना उमेदवारी न देण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, असे राजकीय गोटातून समजते.