‘मै भी चौकीदार’ची धनंजय मुंडेंकडून खिल्ली तरीही मोदी म्हणतात धन्यवाद ! मुंडेंनी उडवली पुन्हा खिल्ली 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चौकीदार चौर है असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेकदा हल्ला चढवला आहे. राफेल करारात मनमानी करून, घोटाळा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांचा ३० हजार कोटींचा फायदा करून दिला असा आरोप काँग्रेसने आणि राहुल गांधींनी अनेकदा केला आहे. या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मै भी चौकीदार ही नवी मोहीम सुरू केली आहे. दरम्यान या मोहीमेची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांवर नरेंद्र मोदी यांनी त्यांना धन्यवाद म्हटलं आहे. त्यावरून धनंजय मुंडे यांनी मोदींच्या या ट्विटची पुन्हा खिल्ली उडवली आहे.

काय आहे धनंजय मुंडे यांचा ट्विट ?
मै भी चौकीदार या मोहीमेची खिल्ली उडवत धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “देशाला हजारो कोटींचा चुना लावून घोटाळेबाज देशाबाहेर पळून गेले. तरीही स्वतःला देशाचे चौकीदार म्हणून घेणारे पंतप्रधान म्हणतात सारं काही आलबेल आहे. त्यांनी असं म्हणून चौकीदारचं काम करणाऱ्या माणसालाच बदनाम केलं आहे. आता चौकीदाराचं काम करणारा माणूसच मोदींना म्हणतो आहे, मै भी चौकीदार मुझे बदनाम ना करो.” असे म्हणत मुंडे यांनी मोदींच्या मै भी चौकीदार या मोहीमेची खिल्ली उडवली आहे.

मोदींनी दिले मुंडेंना धन्यवाद
धनंजय मुंडे यांच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत अकाऊंटवरून (@narendramodi) धनंजय मुंडे यांना धन्यवाद देण्यात आले आहे. मुंडे यांच्या ट्विटला दिलेल्या उत्तरात मोदी म्हणतात की, “मै भी चौकीदार या मोहिमेला तुम्ही दिलेल्या मौल्यवान पाठिंब्याबद्दल धन्यवाद.” असे म्हणत मोदींनी मुंडेंचे आभार मानले आहेत. मुंडेंनी खिल्ली उडवूनही मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत.

मोदींच्या धन्यवादची मुंडेंनी उडवली खिल्ली
मोदींनी मुंडेंना धन्यवाद दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पुन्हा या ट्विटचीदेखील खिल्ली उडवली आहे. मोदींच्या धन्यवादच्या या ट्विटची खिल्ली उडवताना मुंडे म्हणतात की, “४० पैसे रोजाने आणलेल्या लावारीसांवर जबाबदारी टाकली की हे असे होतं. यांना शालजोड्याने हाणलं तरीही धन्यवाद म्हणतात. मोदी शेठ अशा लोकांवर अवलंबून रहाता म्हणून तुमची नाचक्की होते. जरा आवरा, स्वतःला सावरा किती तो मोठेपणा करणार ? जरा ट्विट व्यवस्थित वाचा असा खोचक सल्ला धनंजय मुंडे यांनी  मोदींना दिला आहे.